साध्वी प्रीतिसुधाजी म.सा

        विचार व वाणीचा अमोघ संगम असलेल्या आणि जनकल्याणासाठी झटत समाजजीवन उन्नत करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या साधू-साध्वींच्या मालिकेत प्रीतिसुधाजी म.सा. यांचे नाव अग्रक्रमाने घेता येणारे आहे. अशा प्रीतिसुधाजींचा जन्म पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिक रायसोनी कुटुंबीयात १ ऑगस्ट १९४३ रोजी झाला. वास्तविक संन्यासींचा जन्म हा त्यांच्या दीक्षा मुहूर्तापासूनच होत असतो. त्या क्षणापासून आपले प्रापंचिक जीवनातील नाव, गाव तसेच परिचय यांचा गीतेतील ' जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही... ' यानुसार परित्याग करत नवीन जीवन धारण केले जात असते.
        साध्वी प्रीतिसुधाजी यांनी प्रापंचिक बंधनांचा त्याग करत ७ मार्च १९६२ रोजी जैन भगवतीची दीक्षा घेतली. राष्ट्रसंत आचार्यसम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. आणि श्री उज्ज्वलकुमारीजी म.सा. हे त्यांचे गुरु. बालपणापासूनच अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या असलेल्या प्रीतिसुधाजींनी ज्ञान-विज्ञान, धर्म, दर्शन, समाजशास्त्र आदी विविधांगी विषयांमध्ये सखोल अध्ययन करतानाच हिंदी, संस्कृत, प्राकृत, मराठी तसेच गुजराती या भाषांवर प्रभुत्व मिळविले. आपल्या प्रवचनांमध्ये त्यांनी नेहमीच सामाजिक, धार्मिक तसेच राष्ट्रीय विषयांना प्राधान्य दिलेले आहे. आपल्या सहज आणि सोप्या वाणीतून त्या साधकांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांचा विचार साधकांच्या थेट हृदयाला जाऊन भिडतो.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

        महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल याठिकाणी त्यांनी यात्रा केल्या. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संस्कृतीचे संस्कारही प्रत्येक विद्यार्थ्याच्या ठायी रुजावेत यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीचे धडे देणाºया इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातूनच राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल आकारास आली. धुळे तसेच जळगाव येथे महावीर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच संगमनेर येथील मांची हिल येथे ज्ञानगंगा विद्यापीठ साध्वी प्रीतिसुधाजी महाराज नगर या ठिकाणीही संस्काराचे धडे दिले जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उभारी मिळावी यासाठी १९७३ मध्ये नाशिक येथे साध्वी प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाचीही स्थापना झाली. त्याचा लाभ आज शेकडो विद्यार्थी घेत आहेत.
        

व्यसनमुक्ती व शाकाहार साठी जनजागृती

        आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी अनेक व्यसनी आणि मांसाहारींना व्यसनमुक्त व शाकाहारी बनण्यासाठी प्रेरित केलेले आहे.भगवान महावीर यांच्या ‘अहिंसा’ या प्रमुख सिद्धांतातून प्रेरित होऊन त्यांनी १९८२ मध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागरण करत मुंबईत गोहत्याबंदीचे अभियान सुरू केले होते. या अभियानाचे परिणामही दिसून आले होते. ठिकठिकाणी गोरक्षण संस्था स्थापन झाल्या. गाय केवळ जनावर नाही तर ती एक शक्ती आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, हा विचार त्यांनी पटवून दिला. त्यांच्या प्रेरणेतून स्थापित झालेल्या गोरक्षण केंद्रात आजमितीला हजारो गोवंशांचे संगोपन केले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांनी धर्मस्थानके उभी राहण्यासाठी प्रेरणा देत श्रीसंघ-समाजाला धर्मध्यान व चातुर्मासासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. देशभरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. जनकल्याणासाठी सदोदित अग्रेसर असणाऱ्या साध्वी प्रीतिसुधाजींचा सहवास समस्त समाजाला प्रेरणादायी ठरत आलेला आहे आणि तो यापुढेही कायम राहील.